नांदेड – भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै.डॉ.शंकरराव चव्हाण आणि सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने दरवर्षी नांदेडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणारा ‘कुसुम महोत्सव’ यंदा 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती युवा नेत्या व कार्यक्रमाच्या संयोजिका कु. श्रीजया चव्हाण यांनी आज येथे दिली आहे.या कुसुम महोत्सवानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी तीन दिवस मिळणार आहे.1 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अभिनेते श्रोत्री आणि मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता ‘इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ आणि ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 2 मार्च रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. 3 मार्च रोजी सायंकाळी ‘बॉलीवूड नाईट्स’ या कार्यक्रमाने कुसुम महोत्सवाचा समारोप होईल. गायिका कविता राम, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिका, दत्तात्रय मेस्त्री आणि नृत्य चमूचा सहभाग असेल.कुसुम महोत्सवादरम्यान खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स ठेवण्यात येणार आहेत. या माध्यमातून बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना मदत करण्याचा हेतू आहे.
या कार्यक्रमामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कु.श्रीजया चव्हाण यांच्यासह माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, कु.सुजया चव्हाण व माजी महापौर मंगलाताई निमकर यांनी केले आहे.