नांदेड. : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड शहरासह जिल्ह्यातील समित्या बरखास्त केल्या. अलीकडच्या काळात नांदेड शहराच्या अध्यक्षपदी माजी महापौर अब्दुल सत्तार यांची, तर कार्य अध्यक्षपदी बालाजी चौहान, डॉ.दिनेश नखाते, सुभाष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.व माजी नगरसेवक सुभाष रॉयबोले यांची ब्लॉक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच नाना पटोले यांनी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्यापदी मुंतजीबोद्दीन यांची नियुक्ती केल्याने आता नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यासाठी दोन प्रभारी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड उत्तर विभाग साठी माजी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह सुभाष राठोड व गंगाधर सोंडारे यांची कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या नेत्यांकडे मुदखेड, किनवट ,माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, हिमायत नगर, नांदेड तालुक्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांची दक्षिण विभाग प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तसेच माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, राजेश पावडे व तिरुपती कदम उर्फ पप्पू कोंडेकर यांची कार्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नायगाव, मुखेड , बिलोली, कंधार, उमरी, धर्माबाद , लोहा, देगलूर या तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.