अकोला: रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा देखील बिगुल फुंगल्या गेला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी लोकसभेसोबतच दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा आपला उमेदवार जाहीर केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढणारे साजिद खान पठाण यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवून पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२, तर साजिद खान पठाण यांना ७० हजार ६६९ मते मिळाली होती. दोन हजार ५९३ मतांनी साजिद खान पठाण यांचा पराभव झाला होता.