बेळगाव:यंदा उत्तर कन्नडा या मतदारसंघाकडे कर्नाटक, महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलंय आणि त्याला कारण म्हणजे काँग्रेसने दिलेली इथली उमेदवारी. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना पराभूत करायचंच या उद्देशाने यावेळी काँग्रेसने खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत पहिल्यांदाच या मतदारसंघातून एका मराठा समाजाच्या आणि मराठी भाषिक असलेला उच्चशिक्षित महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून काँग्रेसने मोठी चाल खेळल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे प्रस्थापित खासदाराविषयी असलेली नाराजी आणि मराठी भाषिक उमेदवाराला मिळालेली संधी या गोष्टी लक्षात घेता डॅा अंजली निंबाळकरचं पारडं जड असल्याचं दिसतंय.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या नात असलेल्या डॅा. अंजली निंबाळकर या कर्नाटकातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असून कृत्रिम गर्भधारणा (IVF) विशारद आहेत. त्या मूळच्या धाराशिवमधील उमरगा या गावच्या आहेत. मुंबईतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह कोल्हापूरचे सुपुत्र आणि कर्नाटकातील धडाडीचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याशी झाला.
वैद्यकीय क्षेत्रात मोठी संधी असतानाही त्यांनी बेळगावच्या सरकारी दवाखान्यात सेवा करण्याचं ठरवलं. मागास असलेल्या खानापूर आणि इतर परिसरातील महिला आणि मुलामुलींच्या आरोग्याची आणि शिक्षणाची परिस्थिती आणि होत असलेली आबाळ जवळून पाहिली, अनुभवली आणि त्यांनी राजकारणात यायचं निश्चित केलं.
सन 2018 च्या विधानसभा निवडणुकीत अंजली निंबाळकर या निवडून आल्या. स्वातंत्र्यानंतर काँगेसने ही जागा पहिल्यांदाच जिंकली होती. आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी मूलभूत सुविधा आणि शिक्षणासोबतच महिला सबलीकरण आणि महिला आरोग्यावर विशेष भर दिला. खानापूर येथे 60 बेडचे शिशू-माता स्पेशालिटी हॅास्पिटल उभारलं. तालुका हॅास्पिटलसाठी 100 कोटी रूपये खर्च करून त्याला आधुनिक रूप देण्याचं काम चालू केलं. पंचवीस वर्षे प्रलंबित खानापूरच्या बसस्टँडचा प्रश्न मार्गी लावत अत्याधुनिक बस स्थानकाचा पाया घातला. खानापूरच्या आमदार असताना त्यांनी विधानसभेत केलेली भाषणे चांगलीच गाजली.
मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे समस्यांचं अभ्यासपूर्वक विश्लेषण आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. गावागावातील महिला, मुली आणि युवक यांच्याशी त्या थेट जोडले गेले आहेत. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह दिल्लीतील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.
उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कित्तूर आणि उत्तर कन्नडा जिल्ह्यातील हल्याळ, कारवार, कुमठा, भटकळ, सिरसी आणि यल्लापूर अशा सहा मतदारसंघाचा समावेश होतो. यात पाच काँग्रेसचे आणि भाजपचे तीन आमदार आहेत.उत्तर कन्नडमध्ये एकूण मतदारांपैकी जवळपास साडेपाच ते सहा लाख मतदार हे मराठी भाषिक आहेत. त्यापैकी 3.20 लाखांहून जास्त मतदार हे मराठा समाजाचे आहेत. खानापूर, दांडेली, जोयडा, मुंडगोड, यल्लापूर आणि कारवार तालुक्यात मराठी भाषिक आणि बहुतांश मराठा समाज आहे. या व्यतिरिक्त कित्तूर आणि यल्लापूर येथे कन्नड भाषिक मराठा समाज आहे. त्यामुळे हे मतदान ज्याच्या पारड्यात तो खासदार असं काहीसं चित्र आहॆ.सीमाभागातील मराठा आणि मराठी भाषिक समाजाला कर्नाटक राज्याच्या राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. अंजली निंबाळकरांनी आतापर्यंत अनेकदा आवाज उठवला.महाराष्ट्रात ज्यावेळी मराठा आरक्षणावर आंदोलनं होत होती, त्यावेळी कर्नाटकातील मराठा समाजाच्या हक्कासाठी डॉ. अंजली निंबाळकरांनी रान उठवलं होतं. त्यामुळेचं कर्नाटकातील मराठा समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून डॉ. अंजली निंबाळकरांकडे पाहिलं जातंय. त्याचसोबत सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून त्यांनी धडाडीने काम करत अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.