नांदेड. 4/मे (वार्ताहर): नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान करण्यात आला आहे. नांदेडमध्ये मतदानाच्या दिवशी बिलोली तालुक्यात एका तरुणाने कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडले, त्याला ताब्यात घेऊन त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड शहरात मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर एका तरुणाने मतदानाच्या वेळेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. दिलीप उत्तरवार यांच्या फिर्यादीवरून या मतदाराविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मतदान करताना व्हिडीओ बनवून उमेदवाराच्या चिन्हासह व मतदान यंत्रासह सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोन मतदारांविरुद्ध राज्य कर निरीक्षक प्रकाश यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.