मुंबई, दि. १० मे :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे. शरद पवारांची एनसीपी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणून टीका करता व ठाकरेंबद्दल ममत्व दाखवता आणि शरद पवारांना जाहीर ऑफर देता म्हणजे नरेंद्र मोदी यांनीच पराभवावर शिक्कामोर्तब केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची कार्ड वापरली पण कोणतेच कार्ड चालले नाही, हिंदु-मुस्लीम कार्डही फेल गेले, त्यामुळे नरेंद्र मोदी यांना दररोज नवे कार्ड वापरावे लागत आहे. लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते नेता नाही, जनता आता नरेंद्र मोदींच्या फेकाफेकीला कंटाळली आहे त्यामुळे मोदी काहीही बोलले तरी आता त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पराभवाची भिती स्पष्ट दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातच २९ जाहीर सभा घेत आहेत, मोदींच्या हातातून निवडणूक गेली आहे हे यातून स्पष्ट होत आहे. ज्यांच्यावर कालपर्यंत कठोर टीका केली त्यांनाच ऑफर देण्याची वेळ नरेंद्र मोदी यांच्यावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार या राहुल गांधी यांच्या विधानाला नरेंद्र मोदी यांचा दुजोराच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवाच्या भितीने आपल्या मित्रोंवरही तोफ डागली. लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने ४ वर्षांचा सेवा कार्यकाळ असलेली अग्निवीर योजना आणली, ४ वर्षानंतर त्यांना निवृत्ती दिले जाते पण ४ जूननंतर नरेंद्र मोदी हे राजकीय अग्निवीर योजनेचे लाभार्थी होणार आहेत आणि त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे व अजित पवार हे ही अग्नीवीर होणार आहेत हे मात्र नक्की, असेही नाना पटोले म्हणाले.