मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२४
बदलापूरच्या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपा महायुती सरकार महिला व मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय राज्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये आंदोलन करणार आहेत, तसेच सह्यांची मोहिम राबवणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकार महिला व मुलींना संरक्षण देऊ शकत नाही. मा. उच्च न्यायालयानेही या सरकारला फटकारले आहे तरीही त्यांना जाग येत नाही. महिलांचे संरक्षण तर ते करु शकत नाहीतच उलट मुलींनी ७ वाजल्यानंतर बाहेर पडू नये असे सल्ले देत आहेत. संवेदना नसलेल्या महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना जनजागृती करुन मुलींना आश्वस्त करणार आहे, असेही पटोले म्हणाले.
या आंदोलनाची आणि जागृती मोहिमेची माहिती एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांनी दिली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी,आमदार अभिजीत वंजारी, सुरभी द्विवेदी आदी उपस्थित होते.