एखाद्याच्या नावाला पाठिंबा जाहीर करणे हा फतवा असू शकत नाही
नांदेड (वार्ताहर) : नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार मोहन हुंबर्डे यांची स्थिती स्थिर आहे. शहरात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून काँग्रेसच्या उमेदवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र जातीयवादी शक्तींकडून रचले जात आहे. त्यांचे नापाक मनसुबे हाणून पाडले जातील. असे प्रतिपादन काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी पत्रकार परिषदेत केले. शहरातील हॉटेल अतिथी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात ज्येष्ठ नेते एम. झेड.सिद्दीकी, अब्दुल रहमान सिद्दीकी, माजी उपमहापौर शफी अहमद कुरेशी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शमीम अब्दुल्ला, माजी नगरसेवक अब्दुल लतीफ, मोहम्मद नासीर, वाजिद जहागीरदार, फारुख बडविल, चांद पाशा कुरेशी, अब्दुल फहीम, सय्यद शोएब हुसेन, अब्दुल हफीज बागबान, बाबू भाई खोखेवाले, अस्लम पठाण, शेख अस्लम, महंमद रिजवान कुरेशी, अब्दुल मोहित आदी उपस्थित होते. एमझेड सिद्दीकी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एका मौलानाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणारे पत्र जारी केले होते, त्यावर राज्यभरात वेगवेगळी मते येत आहेत आणि काही वृत्तपत्रे याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध करत आहेत. फतवा काढण्याचा अधिकार असलेल्या एकाही धर्मपंडिताने अद्याप कोणत्याही राजकीय मुद्द्यावर फतवा काढलेला नाही. एखाद्याच्या नावाला पाठिंबा जाहीर करणे हा फतवा असू शकत नाही. अधिवक्ता अब्दुल रहमान सिद्दीकी म्हणाले की, एका मराठी वृत्तपत्राने दिशाभूल करणारी बातमी प्रसिद्ध केली असून त्यात मौलाना सज्जाद नौमानी यांनी पत्रकार परिषदेत जारी केलेल्या यादीचा संदर्भ देऊन फतवा जाहीर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या बातमीत अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा उल्लेख केला आहे. मौलाना सज्जाद नौमानी यांच्या वतीने पत्रकार परिषदेत या गोष्टी केल्या नसताना सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. मौलाना सज्जाद नौमानी हे एक धार्मिक विद्वान आहेत आणि आम्ही त्यांचा खूप आदर करतो. अब्दुल रहमान सिद्दीकी म्हणाले की, नांदेडमधील आम्ही सर्व मुस्लिम नेते नांदेडमध्ये पूर्ण ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी उभे आहोत. शहर व जिल्ह्यातील मुस्लिम समाज महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार आणि नांदेड दक्षिणमध्ये मोहन हुंबर्डे यांना काँग्रेसच्या सर्व मुस्लिम नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असून, मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने मोहन हुंबर्डे यांच्या पाठीशी उभे आहेत आणि निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेसचे अनुकूल वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र आपण सर्वांनी संघटित होऊन काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळवून देण्याचा प्रयत्न करू.