नांदेड : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या यांच्या सुचनेनुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 31 मार्च 2025 अशी आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता शासनाने 3 संस्था, उत्पादकांची निवड राज्य शासनाने अधिसुचनेद्वारे केली आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोन मध्ये विभागणी करुन मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड, मे. रिअल मेझन इंडीया लिमीटेड व FTA HSRP Solution Pvt.Ltd या 3 संस्था, उत्पादकांची निवड करण्यात आली आहे.हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता Appointment पध्दत सुरु करण्यात आली असून त्यासाठी वाहन प्रकारानुसार दरआकारणी केली जाईल. झोन 1 करिता मे रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली असून वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. याव्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रक्टरकरिता दर 450 रुपये, तीन चाकी वाहनांकरिता 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता 745 रुपये इतका दर आकारला जाणार असुन या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्याकरिता Appointment घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत, नियुक्त केलेले अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना एचएसआरपी बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही.
एक एप्रिलपासून ज्यांच्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट नसेल अशा वाहनांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या दंडाचा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक वाहनचालक धडपड करीत आहेत. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामह अन्य समाजमाध्यमांवर लिंक पाठवून किंवा बनावट संकेतस्थळाचा ॲड्रेस टाकून अनेकांना जाळ्यात ओढत आहे. ‘लिंकवर क्लिक करा आणि घरपोच मिळवा एचआरएसपी प्लेट’, अशी आमिषे दाखवत आहेत. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक शहरातील अनेकांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड प्लेट म्हणजेच एचएसआरपी होय. सरकारने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सींच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन एचएसआरपीची ऑनलाइन नोंदणी करावी लागते. आपल्या वाहनांची माहिती नोंदवावी लागते. त्यानंतर नोंदणी दरम्यान, वाहनाच्या तपशीलांची सत्यता अधिकृत पोर्टलद्वारे तपासली जाते. निर्धारित तारखेला आपल्या वाहनावर एचएसआरपी बसवण्यासाठी नियुक्त केंद्रावर वाहन घेऊन जावे लागते. वाहनाच्या प्रकारानुसार शुल्क भरावे लागते. वाहनचालकांना एक प्रमाणपत्र मिळते. मात्र, ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करावी लागते. त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.राज्यातील प्रत्येक वाहनाला एचएसआरपी लावणे अनिवार्य केल्यामुळे अनेक जण मिळेल त्या मार्गाने एचएसआरपीची नोंदणी करण्यासाठी घाई करीत आहेत. प्रत्येक वाहनचालकाला ऑनलाइन नोंदणी कशी करावी, ती नोंदणी कुठे करावी आणि कशी करावी याबाबत माहिती नसते. या संभ्रमाच्या स्थितीचा फायदा सायबर गुन्हेगारांनी उचलला आहे. सायबर गुन्हेगार अनेकांना फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि विविध संकेतस्थळांवर लिंक पाठवत आहेत. अनेक वाहनचालक समाजमाध्यमांवर येणाऱ्या संदेशांचा बळी पडत आहेत. उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटच्या नोंदणी करा आणि एका मिनिटात आणि घरबसल्या नवीन नंबर प्लेट मिळवा, असा संदेश पाठवून खाली लिंक पाठवण्यात येत आहे. असे संदेश पाठवणारे दुसरे-तिसरे कुणी नसून सायबर गुन्हेगार आहेत.
सरकारने एचएसआरपी नोंदणी करण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांनी वरील शासनाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य असणारे बनवाट संकेतस्थळ निर्माण केले आहे. हुबेहूब शासनाच्या संकेतस्थळासारखे दिसणाऱ्या संकेतस्थळावर जाऊन अनेक वाहनचालक अर्ज भरत आहेत. अशा वाहनचालकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करीत आहेत. मात्र, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन https://transport.maharashtra.gov.in खात्री करावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही.एचएसआरपी नोंदणीसाठी केवळ ४५० रुपयांचे शुल्क लागते. मात्र, सायबर गुन्हेगार शुल्क भरण्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड विचारतात. तसेच मोबाइलवर लिंक पाठवून खाते रिकामे करतात. सध्या सायबर गुन्हेगारांनी राज्यातील महानगरातील वाहनचालकांना लक्ष्य केले आहे.एचएसआरपी नोंदणी न केल्यास १० हजारांचा दंड भरावा लागू नये म्हणून मिळेल त्या मार्गाने नोंदणी करण्याचा प्रयत्न अनेक वाहनचालक करीत आहेत. एक एप्रिलपूर्वीच नंबर प्लेट देण्याचे आमिष सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ किंवा लिंकवरून देतात. त्यांच्या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर काही मिनिटातच एक ‘एपीके फाइल’ आपल्या मोबाइलवर येते. त्यावर एचएसआरपी प्रमाणपत्र किंवा ‘नंबर प्लेट’ असे लिहिलेले असते. अनेक जण उत्सुकतेपोटी ‘एपीके फाइल डाऊनलोड’ करतात. त्यामुळे फोन काही मिनिटांसाठी बंद पडतो. तोपर्यंत सायबर गुन्हेगार आपल्या मोबाइलमध्ये प्रवेश करून बँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक करतो.