नांदेड,19- जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून मार्चच्या मध्यावधीत तापमान 38 अंशांवर पोहोचले आहे. पुढील एप्रिल व मे महिन्यात तापमान अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माठातील पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी, ताक व फळांचे रस घेण्याने शरीराला थंडावा मिळतो. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे. गरज असल्यास सनस्क्रीन, सनग्लासेस, टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा. हलका, सुती आणि सैलसर कपडे घालावेत. उन्हात काम करावे लागल्यास मधून-मधून सावलीत विश्रांती घ्यावी तसेच भरपूर पाणी प्यावे.
उष्माघाताची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. सतत डोके दुखणे, चक्कर येणे, घाम कमी होणे, अशक्तपणा, उलटी-मळमळ, ताप यांसारखी लक्षणे जाणवल्यास तात्काळ सावलीत जावे, ओल्या कपड्याने अंग पुसावे, भरपूर पाणी प्यावे व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्रात त्वरित संपर्क साधावा. लहान मुले व वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उन्हात खेळणाऱ्या मुलांनी टोपी घालावी तसेच सावलीत खेळण्याची व्यवस्था करावी. वृद्धांनी गरजेपेक्षा जास्त मेहनत टाळावी. उन्हाळ्यात शरीराला हलका व पचायला सोपा आहार घ्यावा. हिरव्या भाज्या, रसदार फळे व दूध आहारात असावेत. मसालेदार, तळलेले व जड अन्न टाळावे.
उष्माघात टाळण्यासाठी योग्य आहार, पुरेशी विश्रांती व सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी या उपाययोजना करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.